मे दिनाचा जाहीरनामा, २०१९
भारतीय ट्रेड युनियन केंद्र
मे
दिनाचा जाहीरनामा, २०१९
ह्या मे दिनी, कामगारांच्या आंतरराष्ट्रीय
एकजुटीच्या दिवशी, सिटू जगभरातील कष्टकरी जनतेला भातृभावी
अभिवादन करीत आहे.
नवउदारवादाच्या, विशेषतः
गेल्या एक दशकानंतरही सुरूच असलेल्या, भांडवलशाहीच्या
व्यवस्थागत जागतिक संकटानंतर वाढत गेलेल्या तीव्र हल्ल्यांपासून कामगार वर्गाने
मोठ्या कष्टाने मिळवलेले अधिकार वाचविण्यासाठीच्या लढ्याशी एकजूट दर्शवत आहे.
ह्या मे दिनी, सिटू
साम्राज्यवादाच्या नेतृत्वाखाली वेनेनझुएला, सीरिया, पॅलेस्टाईन, इराक, येमेन, अफगाणिस्तान आणि अन्य देशांमध्ये होणारे हस्तक्षेप,
दगाबाजीची कारस्थाने, हल्ले आणि युद्ध आदी कारवायांचा तीव्र
शब्दात निषेध करीत आहे. अमेरिकन साम्राज्यवादी कारस्थानांच्या विरोधात लढणार्या
त्या देशांमधील जनतेला आणि सर्व पुरोगामी शक्तींना आपला पाठिंबा जाहीर करीत आहे.
अमेरिकन साम्राज्यवादाच्या उघड उघड पाठिंब्याच्या जोरावर पॅलेस्तिनी भागांवर कब्जा
करण्याच्या इझ्राईलच्या प्रयत्नांचा धिक्कार करीत, १९६७
सालच्या सीमा आणि पूर्व जेरुसलेम राजधानी असलेल्या सार्वभौम पॅलेस्टाईन राज्याला
मान्यता देण्याची मागणी करीत आहे.
सिटू या गोष्टीचा ठामपणे पुनरुच्चार करीत आहे
की शोषणावर आधारित भांडवलशाही व्यवस्थेचा पाडाव करून शोषणमुक्त समाजवादी व्यवस्था
निर्माण करण्यासाठीच्या वर्ग संघर्षाचा, साम्राज्यवादाविरोधातील लढा
हा एक अविभाज्य भाग आहे, ज्याला सिटू दृढतेने प्रतिबद्ध आहे.
कोणत्याही बाह्य हस्तक्षेपशिवाय किंवा आक्रमणाशिवाय
स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे समाजवादी व्यवस्था स्विकारायच्या समाजवादी देशांमधील
जनतेच्या अधिकारांच्या पाठीशी सिटू ठामपणे उभी आहे, विशेषतः अमेरिकन
साम्राज्यवादाच्या कारस्थानांशी लढणार्या समाजवादी क्युबाशी असलेल्या आपल्या
एकजूटीचा सिटू ठामपणे पुनरुच्चार करीत आहे आणि त्यांच्यावर लादलेले निर्बंध
ताबडतोब मागे घेण्याची मागणी करीत आहे.
लोकांमध्ये फूट पाडून त्यांचे नवउदारवादाविरोधातील
संयुक्त लढे कमजोर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त भांडवल आणि कॉर्पोरेट वर्गाच्या
पाठिंब्याने जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी डोके वर काढत असलेल्या प्रतिगामी,
प्रतिक्रियावादी, वंशवादी, नवफॅसिस्ट
आणि दहशतवादी उजव्या शक्तींबद्दल सिटू सावधानतेचा गंभीर इशारा देत आहे. नवउदारवादाला
कोणताही पर्याय न देता उलट आपल्या कॉर्पोरेट मालकांचे हित साधण्यासाठी लोकांमधील
असंतोषाला आपसातील झगड्यांच्या दिशेने वळविणार्या ह्या शक्तींच्या विरोधात लढणार्या
जनतेच्या पाठीशी सिटू खंबीरपणे उभी आहे. सिटू जगभरातील कामगार वर्गाला आणि कष्टकरी
जनतेला अशा लोकांच्या शत्रूंना ओळखून त्यांना वेगळे पाडायचे आणि लोकांच्या एकतेचे आपली
संपूर्ण ताकद पणाला लावून रक्षण करण्याचे आवाहन करीत आहे.
आपले अधिकार, वेतन आणि कामाची व जगण्याची
परिस्थिती, तथाकथित काटकसरीच्या धोरणांपासून वाचविण्यासाठी
मोठ्या संख्येने लढ्यात उतरणार्या विकसित देशांसहित विविध देशातील कामगारांचे
सिटू अभिनंदन करीत आहे. भारतात नवउदार धोरणांना सुरवात झाल्यापासून अठरावा
देशव्यापी सार्वत्रिक संप असलेला ८-९ जानेवारीचा प्रचंड मोठा संप यशस्वी
केल्याबद्दल देशातील कामगार वर्गाचे सिटू हार्दिक अभिनंदन करते. ह्या संपाशी एकजूट
दर्शविणार्या शेतकरी, शेतमजूर आणि पुरोगामी लोकांचे, संरक्षण साहित्य उत्पादन, दूरसंचार आदि अनेक
क्षेत्रातील तीन दिवसांसाठी संपावर गेलेल्या कामगारांचे सिटू मनापासून आभार मानते.
दाइकिन, टोयोटा, यामाहा, प्रिकोल इत्यादि देशातील विविध भागातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील लढणार्या
कामगारांशी एकजूट व्यक्त करते.
पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ तसेच इतर
राज्यांमधील सत्ताधारी वर्ग आणि त्यांच्या गुंडांकडून मूलभूत लोकशाही अधिकारांवर
होणार्या हल्ल्यांचा हिम्मतीने प्रतिरोध करणार्या कामगार वर्गाला आणि जनतेला
सिटू सलाम करते. पश्चिम बंगालमधील तृणमूलचे गुंड आणि त्रिपुरातील भाजपाचे गुंड
लोकांवर विशेषतः डाव्यांच्या सहानुभूतीदारांवर शारीरिक हल्ले करत आहेत. लोकांना
मुक्तपणे मत देण्याची परवानगी नाकारून ती राज्य सरकारे लोकशाहीची क्रूर थट्टा करत
आहेत. शेकडो डावे कार्यकर्ते आणि सहानुभूतीदारांवर हल्ले केले जात आहेत, त्यांना जखमी केले जात आहे, प्रसंगी मारले देखील
जात आहे. तरी देखील तिथला कामगार वर्ग अशा हल्ल्यांना वाढत्या ताकदीने प्रतिकार
करत आहे. केरळमध्ये भाजप सर्वोच्च न्यायालयासहित वैधानिक संस्थांना धाब्यावर बसवून
अत्यंत संधीसाधूपणे आपली प्रतिगामी आणि मागास हिंदुत्व विचारसारणी पुढे रेटून
लोकांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न करीत आहे. आरएसएसचे कार्यकर्ते घृणा आणि हिंसा
पसरविण्याचा आणि डाव्या कार्यकर्त्यांना हल्ले करून मारून टाकण्याचा प्रयत्न करत
असतात.
देशातील विविध भागांमध्ये, विशेषतः
भाजप शासित प्रदेशांमध्ये दलित आणि अल्पसंख्यांकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत सिटू
संताप व्यक्त करीत आहे. दलित, आदिवासी आणि महिलांना
दडपण्याच्या मनुस्मृतीच्या प्रतिगामी आणि उच्च-नीच भेदभावाच्या विचारसरणीला
बांधिलकी मानणारे भाजप आणि आरएसएस, निवडणुकीतील फायद्यासाठी
मात्र दलितांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतात.
सिटू आपल्या ह्या मताचा पुनरुच्चार करीत आहे
की बहुसंख्याकांचा आणि अल्पसंख्याकांचा जातीवाद आणि मूलतत्ववाद, हे
एकमेकांवर पोसले जातात. संप्रदायिकता मग ती कोणत्याही रंगाची वा झेंड्याची असो, लोकांमध्ये फूट पाडते, त्यांची एकजूट भंग करते, त्यांच्या दैनंदिन प्रश्नांपासून त्यांचे लक्ष विचलित करते, खरा गुन्हेगार असलेल्या नवउदार धोरणांच्या आणि शोषणाच्या व्यवस्थेविरोधातील
त्यांचे लढे कमजोर करते, अंतिमतः सर्व प्रकारची संप्रदायिकता
शोषक वर्गाच्या हितासाठीच काम करते.
ह्या सर्व राज्यांमध्ये त्यांचे दैनंदिन जीवनाचे प्रश्न
हातात घेऊन सरकारची कामगार विरोधी धोरणे उघड करून कामगार वर्गाची एकजूट आणि
त्यांचा सयुक्त लढा अभंग राखत असतानाच देशाच्या धर्मनिरपेक्ष जडणघडणीचे देखील
रक्षण करण्याच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या धडपडीचे सिटू कौतुक करीत आहे.
सिटू वाढत्या विषमतेची आणि कष्टकरी जनतेच्या
घामातून आणि रक्तामधून निर्माण झालेल्या संपत्तीचे नवउदार राजवटीखाली मूठभर भांडवलदारांच्या
हातात केंद्रीकरण होत असल्याची देखील गांभिर्याने नोंद घेत आहे, ही
संपत्ती कष्टकर्यांच्या शोषणात वाढ करून, भांडवलदारांना
करामध्ये सूट देऊन आणि सार्वजनिक संपत्ती व गरीब शेतकरी,
आदिवासी आणि इतरांना विस्थापित करून, जमीन, जंगल, खाणी, पाणी ह्या
नैसर्गिक साधनसंपत्तीवर कब्जा करून क्रोनिझमच्या मार्गाने जमा केलेली असते.
हा मे दिवस ‘संपत्ती त्यांच्याच मालकीची
असते जे ती निर्माण करतात’ ह्या घोषणेसोबत साजरा करण्याच्या, कामगार संघटनांच्या जागतिक महासंघाने (डब्ल्युएफटीयु) दिलेल्या हाकेला सिटू पूर्ण पाठींबा देत आहे. शोषणकारी भांडवली
व्यवस्थेविरुद्धचा लढा जास्त निर्धारपूर्ण वर्गीय दृष्टीकोणामधून अधिकच मजबूत
करण्याच्या डब्ल्युएफटीयुच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सिटू प्रतिबद्ध होत आहे.
ह्या नफेखोर भांडवलशाही व्यवस्थेत, समस्त
मानव जातीच्या सामूहिक प्रयत्नांमधून साध्य झालेल्या प्रचंड वैज्ञानिक आणि
तांत्रिक प्रगतीचे फळ त्याचा वापर करणार्या काही मोजक्या देशांनी आणि मूठभर कॉर्पोरेटसनी, लोकांच्या उपयोगासाठी नाही तर आपले नफे अनेक पटींनी वाढविण्यासाठी आणि कष्टकरी
वर्गाला दारिद्रयात ढकलण्यासाठी आपल्या कब्ज्यात घेतलेले आहे याबाबत सिटू संताप
व्यक्त करीत आहे. एका बाजूला मूठभर लोकांच्या तिजोरीत ही प्रचंड संपत्ती बंद असताना
कोट्यावधी लोक मात्र, बेरोजगारी,
दारिद्र्य, निरक्षरता, अनारोग्य, निवारा आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा अवस्थेत जगत आहेत, ही संपूर्ण मानव जातीसाठी शरमेची गोष्ट आहे. सिटूचे हे ठाम मत आहे की अशा
अमानुष भांडवली व्यवस्थेला अस्तित्वात राहण्याचा काहीच अधिकार नाही. ह्या
व्यवस्थेला असेच सुरू राहण्याची मुभा कोणत्याही परिस्थितीत देता कामा नये.
ह्या मे दिनी, सिटू
ही भांडवलशाही उखडून फेकण्याच्या आणि संपूर्ण
शोषण समाप्त करण्याच्या अंतिम कार्यामधील कामगार वर्गाच्या भूमिकेबद्दल
कामगारांच्या जाणीव जागृतीचा स्तर उंचावण्याचा निर्धार करीत आहे.
हा मे दिन आपल्या देशातील लोकसभेच्या
निवडणूकींच्या दरम्यान येत असल्यामुळे सिटू आपल्या देशातील कामगार वर्गाला, समस्त
कष्टकरी वर्गाला, पुरोगामी, देशप्रेमी
आणि प्रगत जनतेला, कॉर्पोरेटस च्या हुकूमावरून नवउदार धोरणे
राबविणार्या, आरएसएसच्या प्रभावाखाली सांप्रदायिक आणि
फूटपाडी धोरणे राबविणार्या, कामगार विरोधी, जनविरोधी आणि राष्ट्रविरोधी भाजपचा पराभव करण्याचे आवाहन करीत आहे. सिटू
लोकांना कष्टकर्यांचे खरे मित्र असलेल्या डाव्यांची लोकसभेतील ताकद वाढविण्याची
हाक देत आहे.
गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मोदी प्रणित
भाजपा सरकारने लोकांच्या जगण्यावर आणि रोजीरोटीवर संक्रांत आणून,
राष्ट्राचे हित नफेखोर देशी, विदेशी कॉर्पोरेटसकडे गहाण
टाकलेले आहे. आपल्या देशाच्या संरक्षण उत्पादनासारख्या महत्वाच्या आणि कळीच्या क्षेत्रासहित
संपूर्ण उद्योग क्षेत्राच्या स्वतःच्या उत्पादन क्षमतेचे खच्चीकरण करून, देशाला साम्राज्यवाद्यांच्या मालकीच्या विदेशी भांडवलावर निर्भर बनविण्यासाठी
ते नको तितक्या सक्रियतेने काम करीत आहे. आपले सार्वजनिक उद्योग, आपली नैसर्गिक साधनसंपत्ती, आपली जमीन, आपल्या खाणी, आपली जंगले,
आपले समुद्र बड्या देशी, विदेशी कॉर्पोरेटसना त्यांचे
अमर्याद शोषण करण्यासाठी ताटात वाढून दिले जात आहे, आणि आपले
शेतकरी, आपले आदिवासी, आपले मच्छीमार
आणि आपले कामगार यांच्यापासून मात्र त्यांच्या रोजीरोटीची साधने हिरावून घेतली जात
आहेत.
एकीकडे जागतिक पातळीवर नवउदारवाद आपला मान, सन्मान
गमावत असतानाच भाजप प्रणीत सरकार मात्र आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाच्या
सांगण्यावरून, ‘व्यवसाय करण्याची
सुलभता’ सुधारण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करून प्रत्यक्षात
मात्र ‘लोकांची आणि देशाच्या साधनसंपत्तीची लूट करण्याच्या
सुलभतेला’ प्रोत्साहन देऊन त्याची जास्तच आक्रमकपणे
अंमलबजावणी करत आहे.
कामगारांच्या मूलभूत श्रमिक आणि कामगार
संघटना अधिकारांवर, लोकांच्या जनवादी आणि घटनात्मक अधिकारांवर तीव्र हल्ले होत आहेत.
कामगारांवर गुलामी सदृश्य परिस्थिती लादण्याचा प्रयत्न होत आहे. मतभेदाचे आवाज
पायाखाली दडपून चिरडले जात आहेत. मानव अधिकार कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. इतकेच नाही
तर ठार देखील मारले जात आहे.
भाजपच्या कार्यकाळात तीव्र झालेल्या,
साम्राज्यवादाच्या नेतृत्वाखाली चालणार्या नवउदारवादाच्या अंमलाची वर्षामागून
वर्षे लोटल्यानंतर खालील गोष्टींवर परिणाम झाला आहे.
·
रोजगार विहीन आणि रोजगार नष्ट करणारी वृद्धी
·
नवीन रोजगार निर्मिती करणारी, नाव
घेण्यासारखी एकही खाजगी गुंतवणूक नाही. अनेक उद्योग बंद पडत आहेत.
·
गेल्या ४५ वर्षांमधल्या सर्वात जास्त अशा
धक्कादायक पातळीवर पोहोचलेली, विशेषतः युवांमधली बेरोजगारी.
·
चांगल्या, सन्माननीय, नियमीत नोकर्या गायब झाल्या.
·
बहुतेक कामगारांचे वेतन होते त्या पातळीवर
थिजले, प्रसंगी कमी देखील झाले.
·
वेतन, उत्पन्न आणि संपत्तीची वाढती
विषमता.
·
ग्रामीण भागातील दु:ख, कष्टात व शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ
·
मनरेगाच्या कामामध्ये घट
·
अर्थव्यवस्थेत मंदी
ह्या मे दिनी, सिटू
कामगार, किसान,
शेतमजूर, युवा, विद्यार्थी- समाजाच्या
सर्व घटकांच्या आपली रोजीरोटी, जगण्याची आणि कामाची
परिस्थिती वाचवण्यासाठीच्या वाढत्या लढयांचे स्वागत करीत आहे. दलित, आदिवासींसहित विविध घटकांच्या आपल्या घटनात्मक आणि जनवादी अधिकारांच्या
रक्षणासाठी होणार्या लढयांचे स्वागत करीत आहे.
सिटू कामगार आणि कष्टकरी वर्गाला
निवडणुकीनंतर कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही नवउदारवादी कारभाराचा पराभव
करण्यासाठी आपले लढे अजून तीव्र करण्याचे आवाहन करीत आहे. धोरणांची कॉर्पोरेट
धार्जिणी दिशा बदलून ती जनतेच्या बाजूने वळविण्यासाठी संयुक्त लढे अजून तीव्र
करण्याची हाक सिटू देत आहे.
सिटू आग्रहाने मांडत आहे की हा बदल घडवून
आणण्यासाठी आपल्या देशात पुरेशी संसाधने आहेत. पुरेसे मनुष्यबळ आहे, आपले
पुरुष आणि आपल्या महिला, सर्वांना अर्थपूर्ण रोजगार
देण्यासाठी, त्यांना चांगले किमान वेतन देण्यासाठी, सर्वांना अन्न पुरविण्यासाठी, सर्वांना घरे देण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी, आरोग्यदायी जीवन देण्यासाठी, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा आणि वृद्धापकाळात गरजूंना पेन्शन देण्यासाठी
आणि एक चांगले आणि सन्माननीय जीवन देण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक संसाधने आहेत.
ह्या मे दिनी, सिटू
सिटू हे पुन्हा एकदा आग्रहाने मांडते की देशातील
कामगार वर्ग आणि कष्टकरी जनतेसमारील आव्हानांना तोंड देण्यासाठी एकाच वेळी तीन
बाजूंनी लढा द्यावा लागेल- एक, नवउदारवादाच्या विरोधातील लढा, दुसरा, फूटपाड्या सांप्रदायीक, जातीवादी शक्तींशी लढा आणि तिसरा हुकूमशाहीच्या विरोधातील लढा. ह्या
आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी देशातील समस्त कामगार वर्गाला संघटित
करण्याचा सिटू निर्धार करीत आहे.
कष्टकरी जनतेतील विविध विभागांची एकजूट मजबूत
आणि व्यापक करून त्यांना संयुक्त लढ्यामध्ये
एकत्र करण्याचा खंबीर निर्धार सिटू करीत आहे. जनविरोधी सामाजिक-आर्थिक-राजकीय
सत्तेविरुद्ध प्रतिकाराचा लढा उभारण्यासाठीची ती पूर्वअट आहे.
कामगार, गरीब शेतकरी आणि शेतमजूरांचे
तीव्र शोषण करणार्या नवउदार, भांडवलशाही व्यवस्थेशी टक्कर
देण्यासाठी त्यांची एकजूट करण्यावर सिटू भर देते आणि त्या दिशेने काम करण्याचा
निर्धार करते.
सिटू, नवउदारवादाविरोधातील ठोस
पर्यायी धोरणे मांडून कष्टकरी जनतेला मोठ्या प्रमाणात संयुक्त कामगार चळवळ तसेच संयुक्त लढ्यांमध्ये उतरवून हा
लढा मजबूत करण्यासाठी स्वतंत्र मोहिमा आखण्याचा आणि पुढाकार घेण्याचा निर्धार करीत
आहे.
देशातील पहिल्या राष्ट्रीय कामगार संघटना
केंद्राच्या गठनाची शताब्धी आणि सिटूच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्षाची सुरवात
संपूर्ण २०१९- २० या वर्षात साजरी करण्यासाठी तसेच ‘लढा आणि त्यागाची १०० वर्षे, कामगार वर्गाच्या एकजुटीसाठीच्या संघर्षाची ५० वर्षे’ ही घोषणा घेऊन ‘एकजूट आणि संघर्ष’ यावर लक्ष केंद्रित करून विविध शैक्षणिक व अन्य कार्यक्रम घेण्यासाठी
वचनबदध होत आहे.
सिटू आपल्या विश्वासाचा पुनरुच्चार करीत आहे
की असे प्रचंड लढे आणि त्यांचे सातत्य आपल्याला कामगार वर्गाच्या बाजूनी वर्ग
संतुलन बदलण्याच्या दिशेने पुढे घेऊन जाईल.
ह्या २०१९ च्या मे दिनी सिटू भारतातील तमाम
कामगार वर्गाला आवाहन करीत आहे की:
नवउदार धोरणांना परास्त करून कामगारांच्या
बाजूच्या, जनतेच्या बाजूच्या पर्यायी धोरणांसाठी एकजूट भक्कम करा आणि संघर्ष तीव्र
करा.
कामगार, शेतमजूर, गरीब शेतकरी या कष्टकर्यांचा विविध विभागांमध्ये भक्कम एकजूट सांधा. गाव
आणि जिल्हा पातळीसहित सर्व पातळ्यांवर मजबूत संयुक्त लढे विकसित करा.
सांप्रदायिक आणि जातीवादी शक्तींच्या आपली
एकजूट भंग करण्याच्या कारस्थानांपासून सावध रहा.
कामगार वर्गाच्या आणि कष्टकरी जनतेच्या सर्व विभागांच्या
खर्या शत्रूला- भांडवलदारी व्यवस्थेला आणि त्या व्यवस्थेची तळी उचलून धरणार्या राजकारणाला
आणि शक्तींना ओळखा आणि ही शोषणकारी व्यवस्था बदलण्यासाठीच्या लढ्यासाठी सज्ज व्हा.
ह्या मे दिनी सिटू आपला बॅनर कामगार वर्गाच्या
आंतरराष्ट्रीय एकजुटीसाठी आणि तमाम शोषण आणि दमनाच्या विरोधात उंचावत आहे.
भांडवलशाही, साम्राज्यवाद मुर्दाबाद!
समाजवाद चिरायू होवो!
जगातील कामगारांनो एक व्हा!

Comments
Post a Comment